Pune District : शिक्षकांवरील कारवाईविरोधात आंदोलन
Pune District : मुख्यालयी राहण्याच्या नियमाचा आधार घेत संभाजीनगर जिल्हा परिषदेने गंगापूर-रत्नपूर तालुक्यातील १ हजार ८६ शिक्षकांची एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याची कारवाई केल्याचा शिक्षक समितीचा आरोप आहे.

टाकळी हाजी : संभाजीनगरमधील १०८६ शिक्षकांच्या वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांवर करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता शिरूर तालुक्यातही उमटले असून, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरूर तालुक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
मुख्यालयी राहण्याच्या नियमाचा आधार घेत संभाजीनगर जिल्हा परिषदेने गंगापूर-रत्नपूर तालुक्यातील १ हजार ८६ शिक्षकांची एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याची कारवाई केल्याचा शिक्षक समितीचा आरोप आहे. कारवाईच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन केले होते.
शिरूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी दिवसभर काळ्या फिती लावून आपले नियमित शैक्षणिक कामकाज सुरू ठेवत निषेध व्यक्त केला. शिरूर येथील सेंट जोसेफ शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी शिक्षकांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी कैलास पडवळ म्हणाले, आज वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे शिक्षक वेळेत शाळेत पोहोचतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात. केवळ मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून शिक्षकांवर कारवाई करणे योग्य नाही.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी शरद निंबाळकर, अविनाश चव्हाण, मालन गायकवाड, सखाराम फराटे, शरद धोत्रे, दत्ता आढाव, सुखदेव सातकर आणि गोरक्ष लष्करे यांनी प्रयत्न केले.
शिक्षक मुख्यालयी राहतो की नाही यापेक्षा तो विद्यार्थ्यांना किती गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो, याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. मुख्यालयी राहण्याचा शैक्षणिक गुणवत्तेशी थेट संबंध जोडता येणार नाही, असे पडवळ यांनी स्पष्ट केले.
काही शिक्षकांची दमछाक
अनेक शिक्षकांची मुले शहरांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. वृद्ध आई-वडील तसेच सासू-सासरे मूळ गावी राहत असल्याने त्यांच्या देखभालीसाठी काही शिक्षकांना शाळेपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर राहावे लागते. पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीस असल्याने मध्यवर्ती ठिकाणी निवास करणेही आवश्यक ठरते. अनेक गावांमध्ये शिक्षकांसाठी पुरेशी निवासव्यवस्था उपलब्ध नसल्याने मुख्यालयी राहणे प्रत्यक्षात अडचणीचे असल्याचे पडवळ यांनी स्पष्ट केले.





