Property Registration : राज्यात मालमत्ता खरेदी-विक्रीत मोठी वाढ, सहा महिन्यांत २२ लाखांपेक्षा जास्त दस्तांची नोंदणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील वाढते नागरीकीकरण, औद्योगीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांमुळे जमीन, सदनिका, दुकाने या स्थावर मालमत्तांच्या खरेदी- विक्री व्यवहारांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात 21 लाख 6 हजार दस्त नोंदविले गेले होते. यंदा एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान 22 लाख 22 हजार दस्त नोंदविण्यात आले. मागील वर्षाची तुलना करता यंदा दस्तनोंदणीच्या संख्येत 1 लाख 16 हजारांनी वाढ झाल्याचे दिसून येत असून, महसुलातही मागील वर्षाच्या तुलनेत 1 हजार 841 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
राज्याला महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी- विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते. रेडी रेकनरच्या माध्यमातून शासन दरवर्षी स्थावर मालमत्तेचे दर जाहीर करत असते. ती किंमत कर आकारणीची किमान आधारभूत रक्कम मानली जाते.
मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरांत मोठ्या प्रमाणावर दुकाने, सदनिकांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार होत आहेत. यांसह शहरालगतच्या गावांमध्ये जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदणी विभागाने नोंदविले आहे.
सहा महिन्यांतील आकडेवारी..
एप्रिल 2025 या महिन्यात राज्यात 3 लाख 70 हजार 852 दस्त नोंदविले. त्यातून 3 हजार 747 कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. त्यानंतर मे महिन्यात 3 लाख 82 हजार 496 दस्त नोंदणीतून 4 हजार 736 कोटींचा महसूल जमा झाला. जून महिन्यात 3 लाख 79 हजार 995 दस्तनोंदणीतून 4 हजार 440 कोटी, जुलै महिन्यात 4 लाख 3 हजार दस्तनोंदणीतून 5 हजार 155 कोटी रुपये, आॉगस्ट महिन्यात 3 लाख 31 हजार 710 दस्तनोंदणीतून 4 हजार 915 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 3 लाख 54 हजार 292 दस्तनोंदणीतून 5 हजार 75 कोटी रुपयांचा असा एकूण सहा महिन्यांत 28 हजार 72 कोटींचा महसूल जमा झाला आहे.





