Property Registration 2026 : नोंदणी विभागाचा धमाका! ४५ लाख ७८ हजार दस्तनोंदणी; ६१ हजार कोटींचा महसूल जमा
Property Registration 2026 : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४५ लाख ७८ हजार दस्तनोंदणी पूर्ण; गेल्या वर्षाच्या तुलनेत दस्तांच्या संख्येत मोठी वाढ, महसुलात ३ हजार कोटींची भर.

Property Registration 2026 – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४५ लाख ७८ हजार दस्तनोंदणीतून ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे अडीच लाख दस्तांची संख्या वाढली असून, एकूण महसुलात केवळ ३ हजार कोटींची वाढ झाली आहे. भाडेकरारांचे दस्त वगळता मालमत्ता खरेदीच्या दस्तांत एक लाखाने वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडीरेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींच्या वार्षिक बाजारमूल्य दरांत सरासरी ३.८९ टक्क्यांची वाढ केली होती. त्यानुसार महसुलात वाढ होईल, या अपेक्षेने वर्षभरासाठी ६३ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. नोंदणी विभागाने या उद्दिष्टाच्या ९६.५८ टक्के अर्थात ६१ हजार २८२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत दिलेले वाढीव उद्दिष्ट पाच ते साडेपाच हजार कोटींचे होते. मात्र, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मात्र ते साडेआठ हजार कोटी रुपयांचे होते. अर्थात रेडीरेकनरचे दर वाढविले होते. तरीदेखील उद्दिष्टाच्या जवळपास महसूल गोळा करण्यात विभागाला यश आल्याचे मुठे यांनी स्पष्ट केले.




