Mundhwa Land Scam : अमेडिया कंपनीला पुन्हा मुदतवाढ! वकिलांनी मांडली ‘ही’ भूमिका; मुंढवा जमीन प्रकरण तापले
Mundhwa Land Scam : कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कंपनीकडून वारंवार मुदतवाढ, नोंदणी विभागाच्या भूमिकेकडे लक्ष.

Mundhwa Land Scam – मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या दस्तनोंदणीत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्याबाबत नोंदणी विभागाकडून सोमवारी (दि. १६) सुनावणी घेण्यात आली. कंपनीने म्हणने मांडण्यासाठी पुन्हा पुढील तारीख देण्याची मागणी या वेळी केली. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. ६ एप्रिल रोजी होणार आहे.
मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारात मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर सहजिल्हा निबंध कार्यालयाकडून सात टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये, तसेच २० मे २०२५ या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा १ टक्के प्रमाणे १ कोटी ४७ लाख दंड, अशी एकूण २२ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते.
ही रक्कम भरण्यासाठी पुढील दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत १२ फेब्रुवारीला संपली. त्यानंतर कंपनीकडून नोंदणी विभागाकडे याप्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती. यात कंपनीच्या वकिलांनी कागदपत्रांच्या पूर्तेतेसाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, त्यांना केवळ १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ही सुनावणी ३ मार्च रोजी झाली.
त्यातही कागदपत्रांच्या सुनावणीसाठी मुदतवाढ मागण्यात आली. हे प्रकरण अर्धन्यायिक स्वरुपाचे असल्याने नैसर्गिक न्यायानुसार विभागाने मुदतवाढीची मागणी मान्य करत दि. १६ मार्च रोजी सुनावणी ठेवली. ही सुनावणी सोमवारी पार पडली. त्यामध्ये कंपनीने पुन्हा पुढील तारीख देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत आता दि. ६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीमध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





