देशातील भावना ढवळून काढण्यासाठी जम्मू-काश्मीरचा वापर प्रियंका गांधी यांची भाजपवर टीका

जम्मू : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रथमच जम्मू-काश्मीरमधील प्रचारात सहभागी होत भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. भाजप जम्मू-काश्मीरचा वापर देशाच्या इतर भागांत भावना ढवळून काढण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, कॉंग्रेस जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करेल, अशी ग्वाहीही दिली.
जम्मू-काश्मीरच्या जनतेकडून भाजपने सर्व काही हिरावून घेतले. मात्र, आम्ही जनतेच्या अधिकारांचे, जमिनीवरील हक्कांचे आणि रोजगाराचे रक्षण करू. भाजपने जम्मू-काश्मीरचे रूपांतर राजकीय सारीपाटातील प्याद्यामध्ये केले. जम्मू-काश्मीरसाठीची धोरणे जनतेसाठी बनवली जात नाहीत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा केवळ त्यांच्या मित्रांवर मेहेरनजर करतात. आताचे प्रशासन रिमोट कंट्रोलवर चालते, असे त्या जम्मूतील सभेत बोलताना म्हणाल्या.
जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा हवा असल्यास भाजपला मतदान करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतात. ते चकित करणारे आहे. खरेतर, राज्याचा दर्जा काढून घेणारे तेच आहेत. एखादा चोर टीव्ही चोरतो अन् पुन्हा हवा असल्यास मला सांगा असे म्हणतो. शहांचे वक्तव्य तशाच स्वरूपाचे आहे. केवळ आम्हीच राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतो असा दावा भाजपचे नेते करतात. मात्र, कॉंग्रेस सत्तेत आल्यास ते कार्य तातडीने केले जाईल, असा शब्द प्रियंका यांनी दिला.
जम्मू-काश्मीरच्या जनतेला वाटणाऱ्या चिंतांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही देणे-घेणे नसल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. जम्मू-काश्मीरमधील जनतेला भावनिक साद घालत प्रियंका यांनी माजी पंतप्रधान आणि आजी इंदिरा गांधी यांची एक आठवणही सांगितली. इंदिरा यांनी त्यांची हत्या होण्याच्या ४ ते ५ दिवस आधी काश्मीर भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, त्या आम्हाला काश्मीरला घेऊनही आल्या, असे त्यांनी नमूद केले.





