Priyanka Chaturvedi : केंद्र सरकारला महिला आरक्षणाशी संबंधित 131 वी घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्यात अपयश आले आहे. दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असताना विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली, त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक पारित होऊ शकले नाही. हे विधेयक नामंजूर झाल्याने एनडीएसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातीलमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जात माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण विधेयकाला उघड पाठिंबा दर्शवला. पक्षाच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले असताना चतुर्वेदी यांनी मात्र विधेयक मंजूर न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
“महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणं हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस आहे,” असे त्यांनी एक्सवरुन ट्वीट करत म्हटले आहे. संसद आणि विधानसभेत जाण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मोठी निराशा असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मी सातत्याने या विधेयकाच्या बाजूने उभी राहिले आहे आणि यापुढेही माझी भूमिका बदलणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्या ठाकरे गट सोडून दुसऱ्या पक्षात जाणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याचीही चर्चा आहे.
महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेत पाठवण्यात आल्याने चतुर्वेदी यांची राज्यसभेची संधी हुकली. त्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना अधिक उधाण आले. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका चतुर्वेदी यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रियंका चुतवर्दींनी स्पष्ट केली भूमिका
माझी भूमिका सातत्याने महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने राहिली आहे आणि मी या मुद्द्यावर आवाज उठवतच राहीन.मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही जर तुम्हाला मी जशी आहे तसा पचनी पडत नसेल, तर तो तुमचा प्रश्न आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रियंका चतुर्वेदी यांनी मांडली.