Pune : खाजगी टँकरचे पाणी महागणार; पाणी वितरणात 5 टक्के वाढ, नागरिकांना फटका

Pune News | सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये उन्हाची झळ अधिक तीव्र होणार आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रात विविध भागात खाजगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आता या खाजगी टँकरला पाणी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या दरात महापालिकेने पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
शहरातील पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी पाणीपुरवठा भरणा केंद्र आहेत. या केंद्रावरून खासगी टँकरचालकांनाही महापालिकेकडून पाणी पुरवण्याची व्यवस्था केली जाते. नागरिकांच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत असून मे महिन्यात मागणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता असताना महापालिकेने या दरात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे टँकरचालकांकडून दोखील दरांत वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या खासगी टँकरचालकांना ६६६ रुपयांना मिळणारा दहा हजार लिटरचा टँकर आता महापालिकेकडून ६९९ रुपयांना दिला जाणार आहे. वाढती महागाई आणि पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.



