अग्रलेख : राजकीय नेत्यांचे खासगी जीवन

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत. या त्यांच्या दौऱ्यातील काही चित्रफिती भाजपने प्रसारित केल्या असून एका नाइट क्लबमध्ये राहुल गांधी असल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत आहे. त्यावरून आता विनाकारण राजकारण पेटले आहे. कॉंग्रेस पक्षामध्ये विविध राज्यांमध्ये अंतर्गत वाद आणि धुसफूस सुरू असताना राहुल गांधी नेपाळमध्ये नाइट क्लबमध्ये मजा करत आहेत, अशा आशयाचे ट्विट भाजपने करून या विषयाला तोंड फोडले. नंतर कॉंग्रेसने “विवाह सोहळ्यात सहभागी होणे हा काही गुन्हा नाही’, अशा प्रकारची टिप्पणी केली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय नेते आणि त्यांचे खासगी जीवन हा विषय चर्चेला आला आहे.
समाजात सतत सामान्य नागरिकांच्या नजरेला येणारे राजकीय नेते असोत किंवा इतर क्षेत्रांमध्ये काम करणारे सेलिब्रिटी असोत ते सुद्धा माणूसच असल्याने त्यांनाही इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच खासगी जीवन असते. याचा विसर सर्वसामान्य नागरिकांना पडला तर ते समजण्यासारखे आहे; पण जेव्हा राजकीय पक्ष या विषयावरून राजकारण करू लागतात तेव्हा मात्र देशातील राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे, हे लक्षात येते. सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या विशेषतः राजकारणात वावरणाऱ्यांनी खासगी जीवनात वावरताना मूलभूत काळजी घ्यायला हवी, हे जरी खरे असले तरी हा चर्चेचा आणि वादाचा विषय कसा काय होऊ शकतो याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.
खूप वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना डॉ. फारुख अब्दुल्ला लंडनमधील एका क्लबमध्ये महिलांसोबत नृत्य करताना दिसले होते. त्या विषयाची तेव्हा चर्चा झाली असली तरी डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी ही आपली जीवनशैली आहे, असे तेव्हा सांगून टाकले होते. सरकारी नोकरीतील मुत्सद्देगिरीतून राजकीय मुत्सद्देगिरीकडे वळलेले कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या खासगी जीवनाबद्दल आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाली आहे. थरूर या चर्चेकडे लक्ष न देता ही चर्चा एन्जॉय करतात, असेच आतापर्यंत लक्षात आले आहे. राजकीय नेते म्हटले की, त्यांना अनेक वेळा कार्यकर्त्यांना जपावे लागते. राजकीय हितसंबंध जपताना खासगी मैत्रीसंबंधही जपावे लागतात. एखाद्या राजकीय नेत्याने राजकारणाच्या धबडग्यात वेळ काढून जर काही क्षण खासगी जीवनाला दिले तर त्यात चुकीचे काहीच म्हणता येत नाही.
या विषयावर टिप्पणी करताना चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांनी अतिशय सूचक आणि मार्मिक असे ट्विट केले आहे. “कोणताही राजकारणी 365 दिवस राजकारणी असू शकत नाही’, अशा आशयाचे हे ट्विट महत्त्वाचे मानावे लागेल. पण वर्षातील 365 दिवस केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा विचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जेव्हा अशा प्रकारचा विषय मिळतो तेव्हा त्या विषयाचेही रूपांतर राजकीय विषयात करून चर्चा करण्याची संधी ते सोडत नाहीत, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी ज्या केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्याच मतदारसंघात सध्या भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दौरा करत आहेत, हे या ठिकाणी सूचक मानावे लागेल. अन्य एका मतदारसंघात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता आणि वायनाडमधूनच राहुल गांधी निवडून आले होते. आता त्याच वायनाड लोकसभा मतदारसंघांमध्ये स्मृती इराणी दौरा करत आहेत. राहुल गांधी नेपाळमध्ये खासगी दौरा एन्जॉय करीत असताना त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी स्मृती इराणी वायनाडमध्ये सामाजिक कार्य करीत आहेत, हे भासवण्याचा भाजपाचा हा एक राजकीय प्रयत्न मानावा लागेल. राहुल गांधी यांच्या खासगी दौऱ्याचे छायाचित्र प्रसिद्ध करत असताना भाजपने त्यात आणखीन एक वाद आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण राहुल गांधी यांच्यासोबत जी एक चिनी महिला दिसत आहे ती चीनची राजदूत असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. चीनचे राजदूत म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच दोन-तीन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये भारत विरोधी वातावरण तयार केले होते, असा आरोप होता. त्याचा संदर्भ देत भाजपने या विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणही ओढले आहे.
कॉंग्रेसला विशेषत: राहुल गांधी यांना चीनविषयी विशेष प्रेम आहे, हे भासवण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक वेळा भाजपकडून करण्यात आला आहे, याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. खरेतर अशा प्रकारचा विनाकारण वाद निर्माण होऊ नये याची काळजी त्या त्या राजकीय नेत्यांनीही घेण्याची गरज असते. समजा, कॉंग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असती आणि या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रमच प्रसारित करण्यात आला असता, तर भाजपला टीका करण्यासाठी काहीच उपलब्ध झाले नसते. कारण या दौऱ्यात काहीच खासगी नव्हते, सर्वकाही उघड होते, असा युक्तिवाद कॉंग्रेसला करता आला असता. त्यामुळे राजकीय नेत्यांना आता आपल्या राजकीय दौऱ्यांप्रमाणे आपल्या खासगी दौऱ्यांचेही मार्केटिंग करावे लागणार आहे, असाच निष्कर्ष या सर्व वादातून काढता येतो. कोणत्याही राज्यांमध्ये जेव्हा स्थानिक पातळीवर एखादा नेता तयार होत असतो तेव्हा तो अत्यंत हुशारीने अशा प्रकारच्या खासगी दौऱ्याचे नियोजन करत असतो. एखाद्या कार्यकर्त्याचे लग्न असो किंवा नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे सांत्वन करण्याचा प्रकार असो, हे नेते त्याचेही मार्केटिंग करत असतात. लग्नसमारंभाला उपस्थित राहून आनंद व्यक्त करणे आणि अंत्यविधीला उपस्थित राहून सांत्वन करणे यातूनच अनेक राजकीय नेते कार्यकर्त्यांच्या नजरेत भरतात, असा आजवरचा अनुभव आहे. खासगी जीवन चालू असतानाच आपोआप त्यांच्या राजकीय जीवनाचीही पायाभरणी होत असते.
मैत्री संबंध जपण्यासाठी जर राहुल गांधी यांच्यासारखा नेता नेपाळमध्ये जाऊन विवाह समारंभाला उपस्थित राहात असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे किंवा टीका करण्यासारखे काहीच नाही. दुर्दैवाने सध्या भारतीय लोकशाही राजकारणाने एवढी खालची पातळी गाठली आहे की, कोणावर कधी आणि कशी टीका होईल याबाबत काहीही हमी देता येत नाही. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस एकावेळी 35 पुरणपोळ्या खातात, अशा प्रकारचे विधान केल्यानंतर अद्यापही या विषयाची चर्चा सुरूच आहे, हे त्याचेच एक उदाहरण मानावे लागेल. राजकीय नेतासुद्धा एक माणूसच असतो. त्याला इतर सर्वसाधारण माणसांप्रमाणेच जेवणे-खाणे आणि मैत्री जपणे ही कामे करावी लागतात. ही गोष्ट एकदा लक्षात आल्यानंतर अशा प्रकारचा विषय उपस्थित होण्याची गरज नाही. नेत्यांचे खासगी जीवन ही एक सर्वसाधारण बाब आहे, असाच विचार जर सर्वच राजकीय पक्षांनी केला तर अशा प्रकारचे विनाकारण वाद उपस्थित होणार नाहीत.





