Nitin Gadkari : “सध्याच्या काळात राजकारणाचा अर्थ केवळ सत्तेचा….”; नितीन गडकरींनी टोचले राजकीय नेत्यांचे कान

Nitin Gadkari – राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकास असा आहे. पण आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे. राजकारण हे खरे तर समाजसेवा, राष्ट्र उभारणी आणि विकासाचा समानार्थी शब्द असले तरी सध्याच्या काळात याचा अर्थ केवळ सत्तेचे राजकारण आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले आहे.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सत्कारप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी बोलत होते. नितीत गडकरी म्हणाले, राजकारणाला मतभिन्नतेची समस्या भेडसावत नाही, तर विचारांच्या अभावाची समस्या आहे. याआधी आरएसएसचे कार्यकर्ते म्हणून काम करताना आम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. कोणतीही ओळख आणि आदर नव्हता.
हरिभाऊ बागडे यांनी लोकांच्या कल्याणासाठी समर्पित भावनेने काम केले. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून 20 वर्षे विदर्भात प्रवास केला आणि काम केले. आणीबाणीनंतर लोक आमच्या रॅलींवर दगडफेक करत असत, मी घोषणा देण्यासाठी वापरलेली ऑटोरिक्षा लोकांनी पेटवून दिली होती. आता हजारो लोक मला ऐकायला येतात.
मात्र ही लोकप्रियता माझी नसून हरिभाऊ बागडे यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची आहे, ज्यांनी जीव धोक्यात घालून कष्ट केले. पक्षात काहीही मिळाले नसतानाही चांगलं वागणारा तोच पक्षाचा चांगला कार्यकर्ता असतो. ज्यांना काही मिळते, ते साहजिकच चांगले वागतात, असा टोलाही गडकरी यांनी लगाविला.





