दिशा सालियान प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; ‘या’ नेत्यांनी केली आदित्य ठाकरेंची पाठराखण

मुंबई – दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा नवे वळण मिळाले असून, या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. यात दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर आज, गुरुवार 20 मार्च रोजी अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी काय म्हंटले जाणून घेऊया.
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले, “गेल्या पाच वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण आता न्यायालयात आहे, त्यामुळे मी यावर कोर्टातच बोलेन.” त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. “आम्ही राज्याचे मुद्दे सभागृहात मांडतो, पण सत्ताधारी सभागृहाचे कामकाज बंद पाडतात, कारण त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही,” असे ते म्हणाले. ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला.
मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या प्रकरणावर राजकीय टिप्पणी करणे किंवा राजकारण करणे योग्य नाही.” त्यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे सूचित करत राजकीय वाद टाळण्याचे आवाहन केले.
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले, “मला वाटते की अशा मुद्द्यांचे राजकारण करू नये. मी सर्व नेत्यांना आवाहन करतो की, या प्रकरणाचे राजकीय भांडवल करू नये. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.” त्यांनी या प्रकरणात निष्पक्षपणे न्याय मिळावा, यावर भर दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “कोणत्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी न्याय मागितला असेल, तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. पण हे प्रकरण पाच वर्षांनंतर का उकरले गेले, हेही लोकांना कळले पाहिजे.” त्यांनी भाजपवर निशाणा साधत, “भाजपाला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुद्दा हवा आहे. दिशा सालियान प्रकरणातून ते आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू शकतात का, हे पाहत आहेत,” असे आरोप केले.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण करताना म्हटले, “दिशा सालियान प्रकरणात सीआयडीचा तपास झाला होता, त्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग नव्हता. या याचिकेत तथ्य नाही.” त्यांनी सत्ताधारी गटातीलच असूनही ठाकरेंवरील आरोप फेटाळले.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही संजय गायकवाड यांच्या सुरात सूर मिसळत म्हटले, “या प्रकरणात कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे आरोपांना आधार नाही.” त्यांनी हे प्रकरण राजकीय हेतूने उकरले गेले नसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “दिशा सालियानच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करावी.” त्यांनी यापूर्वीही या प्रकरणात ठाकरेंचा सहभाग असल्याचा दावा केला होता.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले, “नितेश राणेंनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
भाजपचे आमदार अमित साटम यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी “न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू,” असे आश्वासन दिले
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावर राजकीय नेत्यांमध्ये दोन गट पडलेले दिसत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी हे प्रकरण राजकीय हेतूने उकरले गेल्याचा दावा केला, तर भाजप आणि काही सत्ताधारी नेत्यांनी यात तथ्य असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेत्यांनी मात्र ठाकरेंची पाठराखण केल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. हे प्रकरण आता न्यायालयात असून, पुढील सुनावणी आणि तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.



