भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांचा गौरव

नेवासा : नेवासे तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात लंम्पी आजाराने थैमान घातलेल्या सुमारे दोन हजार जनावरांवर यशस्वी नियंत्रण मिळविल्याबद्दल परिसरातील खासगी पशुवैद्यकांचा सन्मान करण्यात आला.
पशुवैद्यकीय दवाखाना कुकाणा अंतर्गत कार्यरत असणारे डॉ. मनोज शिंदे (एम.व्ही.एस्सी) यांनी या संकटात पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने औषधे तयार करून आणि उपचारपद्धतीचे मार्गदर्शन करून जवळपास ३० ते ४० खासगी डॉक्टरांना मोफत औषधांचे वाटप केले. त्यांना डॉ. अमोल गायकवाड यांनी साथ दिली.
या सर्व डॉक्टरांनी कर्तव्य भावनेने मेहनत घेतल्यामुळे जनावरांचे प्राण वाचले. या एकत्रित कामाची दखल घेऊन डॉ. शिंदे यांच्यावतीने सर्व डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी एका दिवसीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात विविध आजार आणि आधुनिक उपचारपद्धतींवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वाजे होते. या सामूहिक प्रयत्नांमुळे लंम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सर्व स्तरांतून डॉक्टरांचे कौतुक होत आहे.





