Pimpri : देहू परिसरात लम्पीचा कोप, प्रशासन निवांत

देहूगाव : लम्पी आजाराने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली असून शेतकरी आणि पशू पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. देहू परिसरात लंम्पी आजाराने जनावर दगावल्याची दुसरी घटना गुरुवारी ( दि.३ ) सकाळी घडली. लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून परिसरामध्ये आठ ते दहा जनावराला लंम्पी आजार झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या पशू दवाखान्यात गेल्या तीन वर्षांपासून पशु वैद्यकीय डॉक्टरच नाही तर एकदाही या परिसरात वेळा पशू वैद्यकीय विभागाचे अधिकारी – कर्मचारी अथवा डॉक्टर फिरकलेच नसल्याने जनावरे उपचारा अभावी वाऱ्यावर आहेत. तीर्थक्षेत्र देहू परिसरात अनेक शेतकरी शेतीसह पशूपालन करीत आहे.
अनेकांकडे दुग्ध व्यवसायासाठी गायी म्हशी आहे. तर काही बैलगाडा शौकीन बैलांचाही संवर्धन करत आहे .या पशुसंर्वधनार्थ ,जनावरांच्या उपचारार्थ असणाऱ्या दवाखान्यामध्ये पशू वैद्यकीय डॉक्टरच तीन वर्षांपासून नसल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांची उपचाराअभावी गैरसोय होत आहे. सध्या शेतकऱ्यांची शेत कामे सुरू आहेत.
राज्यात जनावरामध्ये लम्पी नावाचा रोग उद्भवत आहे. लम्पी रोगामुळे सागर हगवणे यांची कालवड तीन दिवसांपूर्वी दगावली होती. तर नितीन काळोखे यांचा पावणेदोन वर्षाचा बैल दगावला आहे. सतीश काळोखे, प्रशांत काळोखे यांच्या सह सात ते आठ जणांच्या शेतकऱ्यांच्या जनावराला लंम्पी आजाराने ग्रस्त आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहूत पशू वैद्यकीय अधिकारीच फिरकत नसल्याने जनावरांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे.
लम्पी आढळणाऱ्या जनावरांच्या पाच किमी परिसरात दक्षता घेतली जाते आणि सुमारे पाच किमी परिसरात लसीकरण मोहीम राबवण्यात येते. देहूतील शेतकऱ्यांसह पशूपालन करणारे जनावरांच्या लंपी रोगांपासून धास्तावले आहेत .मात्र प्रशासनाचे याकडे बिल्कुलच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे तीर्थक्षेत्र देहूतील पशू वैद्यकीय जागा रिक्त आहे. सध्या तेथे तात्युरते पशू चिकित्सकांची त्वरीत नियुक्ती केली जाईल. भरती प्रक्रिया नंतर कायमस्वरूपी पशू वैद्यकीची नियुक्ती करण्यात येईल.
– डॉ अंकुश परिहार (उपायुक्त ,पुणे जिल्हा पशू संवर्धन विभाग)





