लम्पीची दखल घेत १६५ जनावरांचे त्वरित लसीकरण; दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली

देहूगाव :“देहू परिसरात लम्पीचा कोप, प्रशासन निवांत” या मथळ्याखाली दैनिक प्रभातने शुक्रवारी (दि. ४) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची त्वरित दखल जिल्हा पशुचिकित्सालयाने घेतली असून, त्याच दिवशी देहू परिसरातील १६५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, लम्पी आजाराची लक्षणे असलेली पाच जनावरे आढळून आली आहेत.
देहू विठ्ठलवाडी येथे मागील चार दिवसांत लम्पी आजाराने दोन जनावरे दगावल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात दैनिक प्रभातमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर औंध पॉलीक्लिनिकचे पशुवैद्यकीय अधिकारी पथक शुक्रवारी सकाळी देहूत दाखल झाले.
पथकामध्ये डॉ. वर्षा शिंदे, डॉ. अमित शिरसागर, तेजस पटेल, अभिजीत निकाळे, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. चंद्रकांत कोरके यांचा समावेश होता. या पथकाने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गोठ्यांमधील जनावरांची तपासणी केली व लसीकरण केले.
दरम्यान, पाच जनावरे लम्पी संशयित आढळून आली असून त्यांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, देहू परिसरासाठी विशेषतः डॉ. युवराज रगतवार यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. अभिजीत निकाळे यांनी दिली.





