पुणे जिल्हा : खेड तालुक्यामध्ये “लम्पी’ने बाधित एकही जनावर नाही

पशुधन विकास अधिकारी डॉ. शेळके; जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध नाही; पण खासगी लसीकरण सुरू
राजगुरूनगर – खेड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही जनावर लम्पी आजाराने बाधित नाही, तालुक्यात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ योगेश शेळके यांनी दिली.
देशात सर्वत्र गाय, म्हैस, बैल, रेडा यांना लम्पी स्किन डिसीज या व्हायरसची लागण होत असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. या जनावरांच्या आजाराने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यामध्ये या आजाराचा प्रसार झाला आहे; मात्र खेड तालुक्यात अद्यापर्यंत एकही जनावराला या आजाराची लक्षणे नाहीत.
तालुक्यात जनावरांना लम्पी व्हायरसची लागण नसल्याने जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध झालेली नाही; मात्र खबरदारी म्हणून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी शासनाची लस येण्याची वाट न पाहता पशुधन संर्वधनासाठी खासगी लसीकरण सुरू केले आहे. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गावागावांतील दूध संकलन केंद्रावर जनजगृती केली जात असून प्रत्येक गावात सूचना मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. शासनाची लस उपलब्ध न झाल्याने तालुक्यात खासगी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.पशुधन मालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लक्षणे असलेल्या जनावरांवर तात्काळ उपचार करावेत. विलीनीकरण कक्षात लक्षणे असलेल्या जनावरांना ठेवण्यात यावे. पशुधनाची खरेदी विक्री टाळावी.
– डॉ. योगेश शेळके, पशुधन विकास अधिकारी, खेड तालुका
तालुक्यात लाखांवर जनावरे
खेड तालुक्यात 64 हजार 981 गायी, बैल, वासरे आहेत. 28 हजार 838 म्हशी, टोणगे, पारडे आहेत. सुमारे 32 हजार 800 शेळ्या व 3 हजार 513 मेंढ्या आहेत. या सर्वांना आरोग्य सेवा देण्यासाठी तालुक्यात राज्य सरकारचे 13 दवाखाने तर पुणे जिल्हा परिषदेचे 24 दवाखाने कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून पशुधनावर उपचार केले जातात.





