मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटून अपघात; तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खासगी बसच्या या अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. खासगी बस पलटून अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेकडून कोकणाच्या दिशेकडे जात असताना हा अपघात झाला. या बसमध्ये 35 हून अधिक प्रवाशी अडकल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कर्नाळा खिंडीतील अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलादपूरजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड ते पोलादपूर दरम्यान महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी धडक देऊन ट्रकचालक पसार झाला.
वैभव रमेश पालकर असं अपघतात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.





