Prithika Pradeep: पिंपरी-चिंचवडच्या प्रिथिकाचा आशियाई स्पर्धेत ‘सुवर्णवेध’! अंतिम सामन्यात चीनला धूळ चारत रचला इतिहास
Prithika Pradeep: पिंपरी-चिंचवडची खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर चमकली; प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे भारताचा गौरव वाढला.

Prithika Pradeep- एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने चीन संघाचा २३८-२३४ अशा गुणांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक भारतीय संघामध्ये खेळाडू प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी यांचा समावेश होता.
भारतीय संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत आघाडी कायम ठेवली आणि अंतिम फेरीत अचूक निशाणा साधत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. भारताचा २३८ गुणांचा अंतिम स्कोअर हा दक्षिण कोरियाने २०१४ मध्ये नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला. भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा २३४-२३३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ज्योती सुरेखा वेन्नम यांचे हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे, तर प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनीपार्थी यांनी आपल्या पहिल्याच एशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. या विजयामुळे एशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या सुवर्णपदकांच्या यादीत आणखी एका मानाच्या पदकाची भर पडली आहे.
प्रिथिका प्रदीपच्या या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या धनुर्विद्येच्या विकासकार्याला आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या संधींना या यशामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून घडलेली खेळाडू एशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकते,
ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या या कामगिरीने केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचा गौरव वाढला आहे. प्रिथिकाच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे. तसेच तिच्या पालकांनी दिलेला विश्वास, त्याग आणि सततचे प्रोत्साहन हे तिच्या यशाचे मजबूत आधारस्तंभ आहेत.






