आरोग्य विभाग सक्षम करण्यास प्राधान्य; अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे – ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने सक्षम करण्यात येत आहे. सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींना दिला आहे.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय यांना मान्यता देणे, खाटांची संख्या वाढवून श्रेणीवर्धन करणे यास मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पाबळ, मलठण, आंबेगाव तालुक्यातील तळेघर ग्रामीण रुग्णालयास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. राजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाईल. पिंपरखेडा, कारेगाव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन उपकेद्र मंजूर करण्यात येईल. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
विविध ठिकाणचा आढावा
खेड येथे ट्रामा केअर युनिट निर्माण करणे, चाकण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. निरावागज (ता. बारामती) व जेरवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत बैठकीत आदेश देण्यात आले. यावेळी अन्य जिल्ह्यांच्या आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आला.





