पुणे | महापालिका आयुक्तांसमोर मांडला ठिय्या

पुणे {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षक भरती २०२२ मधील उमेदवारांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुणे महापालिकेला शिफारस केली आहे. या उमेदवारांची ५, ६,७ आणि ११ मार्च २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी देखील झाली आहे. मात्र अद्याप ४४१ उमेदवारांची शिक्षक म्हणून पात्र अपात्र अशी यादी महापालिकेने लावलेली नाही. त्यामुळे या उमेदवारांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी उमेदवारांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पात्र अपात्र यादी लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनासाठी सुमारे ३० ते ४० शिक्षक अचानक जमल्याने महापालिकेत चांगलाच गोंधळ उडाल्याचेही पहायला मिळाले.
पात्र- अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी, अपात्र उमेदवारांना च्यांच्या त्रृटी पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ द्यावा तसेच मार्गदर्शन करावे. समुपदेशनाचे वेळापत्रक, नियुक्तीपत्र आणि शाळेवर हजर राहण्याची तारीख जाहीर करावी.उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याअगोदर पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आल्या.



