इम्रान खान यांच्याविरोधात देशद्रोहाच्या खटल्याची तयारी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या काही साथीदारांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची तयारी पाकिस्तान सरकारकडून केली जाऊ लागली आहे. गेल्या महिन्यात राजधानीत काढण्यात आलेल्या मोर्च्यादरम्यान हल्ल्यांची तयारी केली जाण्याच्या अनुषंगाने ही तयारी सुरू केली गेली आहे.
इम्रान खान यांच्या व्यतिरिक्त गिलगीट बाल्टीस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांच्याविरोधातही हा देशद्रोहाचा खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सना उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेटच्या विशेष कमिटीच्या बैठकीमध्ये खान आणि इतरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचा विशेष आग्रह धरण्यात आला.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 25 मे रोजी इस्लामाबादेत “आझादी मार्च’ नावाने मोर्चा काढला होता. फेरनिवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र त्या मोर्च्याच्यावेळी झालेल्या हिंसाचारामुळे त्याला अपेक्षित परिणाम साधता येऊ शकला नव्हता.
त्यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पाहता सरकारने इम्रान खान यांच्याविरोधात आगोदरच कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र आता “पीटीआय’चे अध्यक्ष इम्रान खान नियाझी आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मेहमूद खान आणि गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांच्याविरोधात देशद्रोहाची गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई सुरू करण्याची तयारी सरकारने केली आहे.





