Pune District : यवत मुक्कामाची तयारी अंतिम टप्प्यात

पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त : प्रशासन सज्ज
यवत – जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवार (दि.२३) मुक्कामासाठी दौंड तालुक्यातील यवत येथे येत असून सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर ते दौंड तालुक्यातील बोरिभडक हा सर्वात मोठा पल्ला पार करत दौंड तालुक्यातील यवत आणि वरवंड येथे पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असून पहिला मुक्काम यवत आहे. पालखी सोहळा व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यवत ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे आणि सरपंच समीर दोरगे यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी मुक्कामी असून तालुका प्रशासनाबरोबरच यवत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहे.पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी पिठलं-भाकरी जेवणाची व्यवस्था केली जाते. गावातील शाळेच्या मैदान, गुंड मैदान, दोरगेवाडी, यवत स्टेशन आदी परिसरात दिंड्या मुक्काम करत असल्याने जागांची स्वच्छता, दिवाबत्तीची सोय याबरोबरच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी प्रशासनाच्या वतीने केली आहे.
१३ ठिकाणी १२०० मोबाइल स्वच्छतागृहाची व्यवस्था, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात एकाचवेळी ४०० मोबाइल चार्जिंगच्या सुविधा, १९ ठिकाणी मोफत टँकर भरण्याची व्यवस्था, विहिरीमध्ये टीसीएल टाकून पाणी शुध्दीकरण, कचरा कुंड्याची व्यवस्था, ४ मंगल कार्यालय उपलब्ध केले. मंदिर, प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत परिसरात एकाच वेळी १५०० भाविकांच्या स्नानांची सोय, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, हरीत वारीच्या अनुषंगाने झाडे लावण्याचे नियोजन, पालखी रस्ता आणि परिसरात विद्युतीकरण, विद्युत रोषणाई आदी सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने केल्या आहेत. दिंड्यासाठी विविध ठिकाणी शाळेच्या ४० खोल्या व ३ ठिकाणी गॅसची व रॉकेलची व्यवस्था केली आहे.
नियंत्रण कक्षाद्वारे प्रशासनाचा सुयोग्य यंत्रणा राबणार….
श्री कालभैरवाथ मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व पंचायत समिती कडून आरोग्यकक्ष उभारण्यात येत आहे. दौंड पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर डॉक्टर,आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य कर्मचारी, ऍम्ब्युलन्स यांची देखील तयारी करण्यात आली असल्याची माहिती यवतचे सरपंच समीर दोरगे आणि ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी दिली.चालून आल्यावर वारकऱ्यांचा मुक्काम सुखाचा व्हावा, यासाठी आषाढी वारीतील मुक्काम स्थळी शासनाच्या वतीने विशेष व्यवस्था म्हणून एकूण ५० हजार स्क्वेअर फूट आकाराचे मंडप उभारण्यात येत आहे.
यवत येथील बाजार तळावर दोन हायटेक मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. शाळेच्या मैदानावरील मंडपाचे काम सुरू आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्याने वारकऱ्यांसाठी शासनाने विशेष व्यवस्था केली आहे. भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारला आहे. मंडप उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व सहकार्य करत मंडपात पाणी येऊ नये यासाठी मुरुम टाकून सपाटीकरण केल्याची माहिती सरपंच समीर दोरगे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ४, पोलीस निरीक्षक १४, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक ७६, पोलीस अंमलदार ६७२, महिला अंमलदार २७४, होमगार्ड ६७७ असा मोठा पोलीस बंदोबस्त नेमला आहे.





