पुणे | लोकसभा मतमोजणीची तयारी सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.4 जून रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २० फेरी, बारामती २३, शिरूर २६ आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे २५ फेरी होणार आहे.
पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४५३ मतदान केंद्राची संख्या आहे.
त्यामुळे येथील मतदान केंद्रनिहाय मतमोजणी करण्यासाठी सर्वाधिक २१ टेबल आणि फेऱ्या २१ होणार आहेत, तर शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी २० फेऱ्या घेण्यात येणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात २ हजार ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदारसंघातून सर्वाधिक ५६१ मतदान केंद्र भोर विधानसभा मतदारसंघात आणि खडकवासला मतदारसंघात ५१५ मतदान केंद्र असल्याने दोन्ही ठिकाणी २३ फेऱ्या होणार आहेत. तर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर मतदारसंघासाठी २१, तर दौंड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) वखार महामंडळाच्या गोदाम येथे होणार आहे. शिरुर मतदारसंघात २ हजार ५०९ मतदान केंद्र होते.
भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५२१ मतदाने केंद्र असल्याने २० टेबलद्वारे २६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूर मतदारसंघांसाठी प्रत्येकी २४ फेऱ्या आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी २५ फेऱ्यांपर्यंत अंतिम मतमोजणी होईल.





