पुणे जिल्हा | राजगड तालुक्यातही गाव खेड्यांमध्ये वाजली तुतारी

राजगड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात भल्या भल्यांना आश्चर्यचकित करून अनपेक्षितपणे सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळविला. त्यांना एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच विधानसभा मतदार संघात निर्णायक आघाडी मिळाली.
लोकसभा मतदार संघातील सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या राजगड तालुकाही यात मागे राहिला नाही. तालुक्यात सुप्रिया सुळे यांनी सात हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली. बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडल्यास सर्वच गावांमध्ये सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले. तालुक्यात एकूण ५५ हजार मतांपैकी ३४२८२ मतदान झाले होते..
या संपूर्ण निकालामध्ये आमदार संग्राम थोपटे यांची भूमिका निर्णायक ठरली असून त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्यामुळे सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य मिळाले. थोपटे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारतानाच आपले पक्षातील वजन तर वाढवलेच शिवाय भविष्यातील सर्वपक्षीय विरोधकांना धोक्याची घंटा वाजवली.
संपूर्ण निवडणुकीत थोपटे समर्थकांनी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मन लावून काम केले. नेते बदलले फुटले परंतु मतदार हा जागेवरच राहिला. एक अर्थी मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र राजगड तालुक्यात तरी पाहायला मिळाले. गाव तिथे काम ही भूमिका घेऊन आम्ही मतदारांपर्यंत गेलो. आम्ही गावागावात जाऊन खासदारांचे माध्यमातून झालेल्या कामांची, मंजूर झालेल्या कामांची, व सुरू असलेल्या कामांची माहिती मतदारांना दिली.
कोट : तालुक्याच्या प्रत्येक गावांमध्ये व वाड्या वस्त्यांवर विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खा. सुप्रिया सुळे यांच्यामार्फत खर्च करण्यात आला. तालुक्यामध्ये असे एक सुद्धा गाव नाही की ज्या गावांमध्ये विकास निधी पोहचला नाही. म्हणूनच तालुक्यातील जनता कोणत्याही भुलथापांना बळी न पडता खा. सुळे यांच्या मागे उभी राहिली. – संतोष रेणूसे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राजगड तालुका.
मतदारांनी दिलेला कौल आम्ही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून स्वीकारतो. शिवाय नवनिर्वाचित खासदार यांना शुभेच्छा देत असतानाच भविष्य काळामध्ये शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी तालुक्यासाठी कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. – आनंद देशमाने, अध्यक्ष भाजपा राजगड तालुका





