‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांकडून ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
मोहोळ हे रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्ली येथे गेले होते. या सोहळ्यानंतर आपण रात्रीच्या विमानाने पुण्यात परतण्याचे तिकिटाचे नियोजनही केले होते. मात्र, रविवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मोहोळ यांना फोन आला आणि त्यांनी आपल्याला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, असे सांगितले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला. ‘ही संधी मिळाल्याचा अत्यंत आनंद झाला आहे,’ प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आणि मोहोळ यांच्या केंद्रात राज्यमंत्रीपदी निवड या दोन्ही गोष्टींसाठी शहर भाजपने विजयोत्सव साजरा केला. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालय चौकात सायंकाळी सहा वाजल्यापासून शपथविधी सोहळा लाइव्ह पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. त्याठिकाणी फटाके उडवून आणि सर्व नागरिकांना जिलेबी वाटून जल्लोष करण्यात आला.
बुथ कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
– गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता
– बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात
– युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी
– पक्ष संघटनेत ३० वर्षे कार्यरत
– सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान
– २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक
– २०१७ : साली स्थायी समिती धुरा
– २०१९ : पुण्याच्या महापौरपदी संधी
– करोना काळात विविध पातळ्यांवर झोकून देऊन काम
– २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी
– २०२२ : महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस पदी निवड
– २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपची जबाबदारी
– ४ जून, २०२४ : खासदार, पुणे
– ९ जून, २०२४ – केंद्रात राज्य मंत्रीपद





