पुणे जिल्हा | माझ्याबरोबर रशियाचा पीटर आलाय

बारामती, (प्रतिनिधी)- बारामतीची लोकसभा निवडणुक देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधी ठरली. ५५ वर्षांच्या राजकारणात पवार यांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली. देशातील महत्वाच्या नेत्यांमध्ये देखील पवार यांचा उल्लेख होतो.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीच्या नव्या राजकीय पर्वाला सुरवात झाली. बारामतीच्या आखाड्यातील नणंद- भावजयातील लढत आंतरराष्ट्रीय दैनिकाने घेतली. शरद पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यात त्यांनी माझ्याबरोबर एक रशियावरून पीटर आलाय, असे सांगून त्यांनी बारामतीकरांचे कुतुहल जागे केले.
बारामती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत जाहीर झाल्यानंतर बारामतीची निवडणुक अधिक लक्षवेधी ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दैनिकांचे पत्रकार शरद पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यात सहभागी झाले होते.
बारामतीत संपूर्ण देशातील माध्यम प्रतिनिधींनी तळ ठोकला होता. यात आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी देखील अपवाद नव्हते. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेच्या शुभारंभालाच अमेरीकेतील न्यूयाॅर्क टाइम्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुळे यांच्यासह पवार यांनी देखील अमेरिकेतील माध्यम प्रतिनिधींचे स्वागत केले.
मात्र, निकालानंतर देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर बारामतीचे राजकारणाचे आैत्सुक्य कायम असल्याचे बुधवारी (दि १९) स्पष्ट केले. सांगवीपासून विविध ठीकाणी झालेल्या जनसंवाद यात्रेत्र हा तरुण पत्रकार देखील राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित होता.
गोरागोमटा आणि स्थिर नजरेने निरीक्षण करणारा तरुण सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरला. सभेत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. मात्र, सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या कुतुहलावर पवार यांनी माहिती दिली.
बारामतीतील लढतीची रशियात दखल
सांगवी येथे शरद पवार म्हणाले, आज माझ्याबरोबर रशियाचा पीटर आला आहे. बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशासहित जगाचे लक्ष होते. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आला.
त्यांचे नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय, ते म्हटले, गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या. त्याची काय पद्धत असते, हे मला पाहायचे आहे. रशियात सुद्धा बारामतीच्या निवडणुकीची चर्चा झाली. म्हणून ते स्वतः इथे रशियावरून आले आहेत. बारामतीच्या लोकांनी इतिहास निर्माण केला, असे म्हणत त्यांनी बारामतीकरांचे आभार मानून रशियाच्या तरुणाच्या उपस्थितीची माहिती दिली.





