बिशप यांच्या निर्दोषत्वाविरोधात अपिलाची तयारी सुरू

कोट्टयम – कॅथोलिक बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांना नन्सवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष सोडण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. केरळमध्ये मानवता वादी संघटनांनी त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते.
कोट्टयमच्या पोलीस अधीक्षक डी. शिल्पा यांनी पत्रकारांना सांगितले की, या निकालाविरोधात अपील करण्यासाठी विशेष सरकारी वकीलांचे मत आजमवण्यात येत आहे. आम्हाला तपशीलवार निकाल शुक्रवारी उशीरा प्राप्त झाला त्यावर आम्ही कायदेशीर मत आजमावत आहोत.
दरम्यान, बिशप मुलक्कल यांनी सुटका झाल्यानंतर विविध चर्चना भेट दिली. त्यांनी त्यांच्या पाठीशी या प्रकरणाच्या सुरवातीपासून उभे राहणारे आमदार पी.सी जॉर्ज यांचीही भेट घेतली. मात्र त्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार दिला. तर जॉर्ज यांनी हे प्रकरण चर्चला लक्ष्य बनवण्यासाटी रचले असल्याचा आरोप केला.





