देहू परिसरात वारीची तयारी; इंद्रायणी नदी पात्रासह परिसर स्वच्छतेवरही भर

देहूगाव – आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी इंद्रायणी नदी स्वच्छ करणे, पालखी मार्गावरील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे काढणे, याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश अपर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी देहू नगरपंचायतीला दिले.
पालखी सोहळ्याचे प्रस्थान दि. 10 जून रोजी होणार आहे. अवघ्या 20 दिवसांवर सोहळा येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने सोहळ्याचे नियोजन आढावा आणि पालखी महामार्गाची पाहणी संदर्भात मुख्य मंदिराच्या कार्यालयामध्ये बारा दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी बैठक घेतली.
पालखी मार्गाच्या पाहणी दरम्यान सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्त्यांवर पडलेला राडारोडा, पदपथांसह रस्त्यावर होणारे अतिक्रमण, इंद्रायणी नदी पात्रामध्ये जलपर्णी, कचरा, निर्माल्य, रसायन मिश्रित दूषित पाणी, सांडपाणी असल्याचे दिसून आले आहे. तर दूषित पाण्यामुळे मासे मृत होत आहेत. ही बाब गंभीर असल्याने संबंधित विभागाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश अपर तहसीलदार डॉ. निकम यांनी देहू नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे दिले आहेत.





