पुणे जिल्हा | घरघुती बियाणांना प्राधन्य द्या
वाल्हे, (वार्ताहर) – वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे; व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी, बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी सहायक मयुरी नेवसे यांनी शेतकर्यांना केलेआहे.
पुरंदर तालुक्यातील वाल्हेजवळील भुजबळ कामठवाडी येथील नितीन शहा यांच्या शेतावर कृषी विभागातर्फे, तालुका कृषी अधिकारी एस. एस. जाधव, जेजुरी मंडळ कृषी अधिकारी सी. व्हि. धायगुडे, कृषी पर्यवेक्षक जेजुरी 2 पी. डी. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया मोहीम राबवून मयुरी नेवसे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर दर वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरिपातील पिकांच्या बियाण्याची उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया या मोहिमा राबविल्या जातात.
दरम्यान, शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकरीवर्गाला नेवसे यांनी दिली. यावेळी, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, तानाजी भुजबळ, तानाजी पवार, शिवाजी भुजबळ,
नवनाथ पवार, प्रताप भोसले, अनिकेत भुजबळ, सतीश भुजबळ, राजेंद्र चव्हाण, करण भुजबळ आदींसह अनेक शेतकरीवर्ग उपस्थित होते. यावेळी, ऊस, कांदा, भुईमूग आदी पिकांसाठी अपायकारक ठरत असलेल्या हुमणीच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी प्रकाश सापळे करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून, प्रकाश सापळे करण्याचे आवाहन नेवसे यांनी शेतकर्यांना केले.
तर बियाणे बाजारातील बियाणांसारेखच
बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून मूठभर धान्य बाहेर काढून धान्य एकत्र करावे. गोणपाटाचे 6 चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवावे. त्यावर सरसकट 100 दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर 10-10 च्या रांगेत ओळीत ठेवावे, अशा प्रकारे दाण्यांचे एक नमुने तयार करावे. बियाण्यांवर दुसर्या गोणपाटाच्या तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी मारावे.
गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तीनही गुंडाळ्याची सरासरी काढून 100 पैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणे सारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा, अशी माहिती मयुरी नेवसे यांनी दिली.
सोयाबीन पेरणीपूर्वी…
सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे, त्यानंतर रायझोबियम 250 ग्रॅम 10 किलो बियाण्यास बीज्रक्रिया करावी, असे आवाहन नेवसे यांनी केले.





