पुणे | रक्ताचे नमुने बदलल्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व फेटाळला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारमध्ये मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अरुणकुमार सिंग याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात जामिन फेटाळल्यानंतर सिंग याने उच्च न्यायालयात अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज बुधवारी (दि. २३) फेटाळून लावला. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कारवाई पोलिसांनी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सिंगच्या जामिनास विरोध केला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडीत चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपींच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि ॲड. आबिद मुलाणी यांनी बाजू मांडली.
सिंगच्या सांगण्यावरून रक्त दिले…
या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी आदित्य सूद व आशिष मित्तल यांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली.
त्यानंतर आदित्य सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर, आशिष मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
दोघांचेही जामीन फेटाळले…
सूद आणि मित्तल अटकेच्या भीतीने परराज्यात पळून गेले होते. पुणे पोलिसांची पथके आपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी पुण्यात परतले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
न्यायालयीन कोठडी झाल्यावर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. साक्षीदारांचे जबाब आणि सीए अहवालाच्या आधारे दोन्ही आरोपींचा रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकारात सहभाग असल्याचे ॲड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने दोघांचाही जामीन फेटाळला.





