Pune Crime: डॉ. प्रांजल खेवलकरसह पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत; ‘ते’ चॅट्स उघड

पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग पार्टी प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनिष खेवलकर (रा. हडपसर, पुणे) याच्याकडे आक्षेपार्ह व्हिडीओ, ड्रग्ज खरेदीसंदर्भातील चॅट्स आणि हॉटेल पार्टींचे धागेदोरे सापडले आहेत. दरम्यान पाचही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ड्रग्ज आणि चॅट्स उघड –
आरोपींच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम चॅटमध्ये ‘माल चाहिये क्या’ या मजकुराचा उल्लेख असून, त्यावर प्रांजलने ठेऊन घ्या असे उत्तर दिल्याचे आढळले. पोलिसांनी हे ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर डॉ. प्रांजल याच्या जप्त मोबाईल व लॅपटॉपमध्ये महिलांसोबत रात्रीच्या पार्टीतील आक्षेपार्ह व अशोभनीय व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. हे व्हिडीओ आरोपीने गैरहेतूने काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांकडून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि डिव्हीआरची सखोल तपासणी केली असून, आरोपी एकमेकांशी मागील दोन वर्षांपासून नियमित संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
इतर शहरांतही पार्टी –
पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दोन लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, डिव्हीआर कॅसेट आणि कॅमेरा यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींचे फॉरेन्सिक विश्लेषण केल्यावर अनेक महत्वपूर्ण डेटा समोर आला आहे. पोलिसांच्या मते, आरोपी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपी विविध शहरांतील मोठ्या हॉटेलांमध्ये महिलांसोबत पार्टी करत असत. आरोपींकडून मिळालेल्या फोटो व चॅट्सच्या आधारे अधिक आरोपींचा शोध घेणे गरजेचे आहे.
सर्व पुरावे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव या आरोपींची अधिक ३ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.





