Pune : डॉ. अजय तावरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेची रवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी न्यायालयीन कोठडीत केली आहे. रूबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणात प्रत्यारोपणास मंजुरी देणाऱ्या समितीची बैठक झाली होती.
समितीने मंजुरी दिल्यानंतर त्याचा अहवाल ससून रुग्णालयातून तीन दिवसांनंतर रूबी हॉलमध्ये पाठविण्यात आला. याच कालावधी आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
रूबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहआरोपी डॉ. तावरेच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीने दहा किडनी प्रत्यारोपणांना परवानगी दिली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने डॉ. तावरे याला बुधवारी (दि. ४) न्यायालयात हजर करण्यात आले.
डॉ. तावरेच्या अध्यक्षतेखाली समितीने किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिली. याबाबतच्या प्रश्नांना डॉ. तावरे उडवाउडवीची उत्तरे देत आहे. डॉ. तावरेच्या कार्यकाळात झालेल्या दहा किडनी प्रत्यारोपण प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येत आहे.
किडनी प्रत्यारोपण प्रकरणाची बैठक आठ मार्च २०२२ ला झाली होती. त्यात समितीतील सर्व सदस्यांनी त्याच तारखेला किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी देऊनही त्याचा अहवाल ११ मार्च २०२२ ला ससून हॉस्पिटल येथून रूबी हॉस्पिटला पाठविल्याची नोंद आहे. या गुन्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील आणखी कोणी सहकारी अथवा सहभागी आहेत का, याचा आरोपीकडे तपास करण्यात येत आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.





