मुंबै जिल्हा बॅंकेवरील प्रवीण दरेकरांचे वर्चस्व संपुष्टात; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे

मुंबई – अखेर मुंबै जिल्हा बॅंकेवरील प्रवीण दरेकरांचे वर्चस्व संपुष्ठात आले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्षपदाच्या निवडणूकीत विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मते मिळाली.
मुंबै जिल्हा बॅंक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचे वर्चस्व मोडून काढण्याचे निश्चित करण्यात आले. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे.
सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबै बॅंकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.
उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले
अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडले आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचे ठरले. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.





