Thackeray Brand : मुंबईत शिंदेंपेक्षा ठाकरे सरस; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने केले मान्य

Thackeray Brand : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यातील सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे होते. कारण मुंबई महापालिका ही केवळ देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. यंदाची ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली होती.
गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे उलथापालथ झाली आहे. ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई होती, तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची बाब होती. या लढाईत भाजपाने बाजी मारली आणि मुंबई महापालिकेत महायुतीचा (भाजपा-एकनाथ शिंदे गट शिवसेना) महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.
एकनाथ शिंदे सातत्याने सांगत आहेत की, आपल्याकडची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मुंबई हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मराठी मतदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला कितपत स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निकालानंतर मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र, ठाकरे बंधूंचे नेतृत्व नाकारताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वही पूर्णपणे स्वीकारले नाही. मराठी बहुल भागांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उत्तम कामगिरी केली. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले, तर ठाकरे बंधूंनी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे) युती करून त्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त जागा जिंकल्या. यामुळे मुंबईतील मराठी मतदार आजही ठाकरे कुटुंबाच्या विचारसरणीशी जोडलेला असल्याचे स्पष्ट दिसून आले.
या संपूर्ण परिस्थितीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महायुतीच्या यशाचे श्रेय देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशल मार्गदर्शन, त्यांच्या भाषणांचा झंझावात, सूक्ष्म नियोजन आणि रवींद्र चव्हाण यांचे पडद्यामागचे अचूक नियोजन यामुळे भाजपाला मोठा फायदा झाला. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकांमध्ये चमत्कार घडवला, असे ते म्हणाले.
महापौरपदाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “मुंबईकरांना जर वाटत नसते तर त्यांनी मतदान केलेच नसते. मुंबईत मराठी आणि हिंदू महापौर होणार आहे. आम्ही मुंबईच्या विकासासाठी पूर्ण मनाने काम करणार आहोत.” शिंदे गटाच्या कमी जागांबाबत मात्र प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे वस्तुस्थिती कबूल केली. ते म्हणाले, “खरं आहे, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी ठाकरेंना झुकते माप दिले गेले. मराठीच्या स्पिरीटचा शिंदे गटाला फटका बसला.”
तरीही त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करत सांगितले की, शिंदे साहेब हे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे नेते आहेत. ते डगमगणारे नाहीत. भविष्यात महायुती एकत्रितपणे लढली तरच फायदा होईल. महायुती अभेद्य ठेवली तर त्याचा चांगला परिणाम दिसेल.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले, “संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार असे विश्लेषण करणे आता बंद करावे आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.” शेवटी त्यांनी भाजपाच्या भविष्याबाबत विश्वास व्यक्त करत सांगितले, “भाजपा २४ तास निवडणुकीसाठी तयार असतो. या ताकदीने झेडपी निवडणुकीत आम्हाला आणखी मोठे यश मिळेल.”
मुंबई महापालिकेच्या निकालाने एकीकडे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी दुसरीकडे मराठी मतदारांचा ठाकरे कुटुंबाप्रती असलेला कल कायम राहिल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात महायुतीच्या एकजुटीवर आणि मुंबईच्या विकासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.





