Ashok Kharat Case : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय यांचाही जबाब नोंदवण्यात आला. (Ashok Kharat Case) समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर प्रतिभा चाकणकर चौकशीसाठी हजर झाल्या. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर चार खाती उघडण्यात आल्याचे समोर आले असून त्यातून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचे नाव असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळले. संबंधित खाती बनावट असून आपण एकही व्यवहार केलेला नाही, तसेच खात्यांवरील सह्या देखील बनावट असल्याचा त्यांनी दावा केला. देवदर्शनाच्या नावाखाली अशोक खरात यांनी कागदपत्रे घेतली आणि त्यांचा गैरवापर करून खाती उघडली असावीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. (Ashok Kharat Case) तसेच, पोलिसांची अधिकृत नोटीस मिळण्यापूर्वीच माध्यमांमधून माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतःहून पोलिस ठाण्यात येऊन जबाब दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात त्यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनीही खाती पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाने कधीही संबंधित पतसंस्थेला भेट दिलेली नाही, तसेच खाते उघडताना चुकीचा पत्ता वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सह्यांचे नमुने पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून तपासात पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बनावट खाती, आर्थिक व्यवहारांचा स्रोत आणि संबंधित नेटवर्क यांचा सखोल तपास सुरू असून येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Case)