Pralhad Joshi : कर्नाटक कॉंग्रेसमध्येच घोडेबाजार सुरू; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा

बंगळुरू : कर्नाटकमधील सरकार पाडण्याचा भाजपचा राजकीय डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या गोटातून करण्यात आला. त्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांनी पलटवार केला. कर्नाटकातील सत्तारूढ कॉंग्रेसमध्येच घोडेबाजार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेसच्या गोटातून परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असल्याने राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे.
अशात कॉंग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनावर यांनी भाजपला घेरणारा आरोप केला. कॉंग्रेसच्या ५५ आमदारांची यादी भाजपने तयार केली आहे. संबंधित आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून धाक दाखवण्याचा प्लॅन आहे, असे त्यांनी म्हटले. तो आरोप फेटाळण्याच्या उद्देशातून जोशी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ज्यांनी कुठले गैरकृत्य केले असेल; तेच केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर येतील.
चुकीचे काही न करणाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. आमदारांच्या यादीविषयीचा दावा म्हणजे लक्ष विचलित करण्यासाठीचे कारस्थान आहे. उलट, कॉंग्रेसमध्ये सत्तास्पर्धेतून घोडेबाजार सुरू असल्याचे समजते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात कॉंग्रेस आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.





