Prakash Surve : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून, लवकरच या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मुंबईवर भगवा फडकवणार असा निर्धार शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. या सगळ्या वातावरणात शिंदेसेनेचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधकांना तर आयतं कोलीतचं सुर्वेंनी देऊन टाकले आहे. यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागितली आहे. या वादग्रस्त विधाननंतर ठाकरे सेनेकडून शिंदेसेनेवर आणि पर्यायाने आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विधानाचा समाचार घेत टीका करण्यात आली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने एक्सवरील अकाऊंटवरून राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. हेही वाचा : “मतदारसंघात एकवेळ…”; शिंदेंच्या आमदाराच्या वादग्रस्त विधानानंतर राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याची झाली आठवण पाहा व्हिडीओ माय मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे कारण ती खरं प्रेम करते, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाचे आमदार यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना राजसाहेब म्हणाले होते मतदारसंघात एकवेळ थोडा अंधार पडला तरी चालेल पण ‘प्रकाश’ पडलाच पाहिजे… राजसाहेब हे का म्हणाले हे दहिसरवासियांना आता कळलंच असेल… हो प्रकाश पडलाच पाहिजे ! अशी आठवण करून देत पोस्ट अन् व्हिडीओ शेअर केला आहे. आमदार प्रकाश सुर्वें यांनी मागितली माफी मराठी माझी माय माऊली आहे. अनावधनाने माझ्याकडून हा शब्द गेला असेल. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे. माझ्याकडून चुकून शब्द निघाला आल्यामुळे मी मराठी माणसाची माफी मागतो असे म्हणत आमदार प्रकाश सुर्वे यांनी हात जोडून माफी मागितली. आधी काय म्हणाले होते? “मराठी माझी मातृभूमी आणि आई आहे. आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलं आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांवरही कायम ठेवा”, असे वादग्रस्त विधान प्रकाश सुर्वे यांनी केले होते. उदय सामंत म्हणाले…. यानंतर यावर शिवसेनचे नेते मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत मराठी वर प्रेम नाही आहे असा मनसेकडून प्रयत्न सुरू आहे यामध्ये काही तथ्य नाही, असे सांगितले. मराठीबद्दल आम्ही जेवढा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे तेवढा कोणी करत नाही आहे, असेही ते म्हणाले. एखादा शब्द चुकीने गेला असेल त्याच्यावरून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यात काय करणार आहोत त्यावर विचार केला पाहिजे, असा टोला त्यांनी मनसेला लगावला. मराठी आमची आई आहे मराठी आमची मातृभाषा आहे. चुकून एखादा शब्द बाहेर आला असेल त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे देखील मंत्री उदय सामंत म्हणाले. हेही वाचा : नेतान्याहू चीनवर गरजले ! इस्रायलमध्ये ‘मेड इन चायना’ गाड्यांवर बंदी ; का घेतला हा निर्णय? वाचा