दीपाली चव्हाण यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करणाऱ्यांबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर प्रश्न; म्हणाले…

अकोला – दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने लक्ष घातले पाहिजे होते, तसे झाले नाही. वरवर कार्यालयीन त्रास दिल्याने दीपालीने आत्महत्येचा निर्णय घेतला. परंतु या प्रकरणाचा खोलतपास केला तर धारणी आणि मेळघाटमधील वाघांची संख्या कमी होतेय. त्यामागील कारणे सापडली जाऊ शकतात. या भागात सागाची चोरी होतेय. ही चोरी मध्य प्रदेशच्या बाजूने होतेय. त्यातील भानगडी देखील या तपासत बाहेर येऊ शकतात, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दीपाली चव्हाण यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकदा नाही तर दोनदा असा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. ज्यांनी दीपालीवर हा गुन्हा दाखल केला त्यांची आर्थिक परिस्थिती, ते काय करतात, त्यांचा आणि वनविभागाचा काय संबंध आहे का? याबाबतचा खुलासा सरकारने करावा. जर सरकारने हा खुलासा केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक निशा शेंडे अमरावतीतून सर्व माहिती जाहीर करतील.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकंदरित असं दिसतेय की आधी कोणतीही संपत्ती नसणाऱ्या बाहेरच्या एनजीओंकडे भरपूर संपत्ती झाली. या एनजीओंकडे आदिवासींच्या किती जमिनी आहेत त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.
मेळघाट आणि धारणीमध्ये गवळी समाज राहतो. तो खुल्या गटात येतो त्यामुळे त्याची जमीन वर्ग 2 करुन विकली जाऊ शकते. पण आदिवासींच्या जमिनी विकतच घेतल्या जाऊ शकत नाही, असे कायदा सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने देखील 2 वर्षांपूर्वी असा निकाल दिला आहे. त्या निकालानुसार आदिवासींच्या जमिनी विकता येत नाही. विकायच्याच झाल्या तर सरकारच्या परवानगीने लिलाव पद्धतीने विकाव्या लागतात, असेही त्यांनी म्हटले आहे.





