Prajakta Mali : “तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता…”; प्राजक्ता माळीचं सुरेश धस यांना सडेतोड उत्तर, वाचा सविस्तर…

Prajakta Mali – संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यात तीव्र संतापाची लाट असून या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आमदार सुरेश धस आक्रमक बनले आहेत. धस यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे परळी कनेक्शन असल्याचे जाहीर बोलून दाखवले.
तसेच सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांच्यासारखे इव्हेंट मॅनेजमेन्ट पॅालिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांना परळीत यावे, असे विधान करून धस यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. आता या प्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार दिली असून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धस यांनी माफी मागवी, अशी मागणी केली आहे.
धस यांनी बोलून दाखवलेली गोष्ट धांदत खोटी आहे. याला कोणताही बेस नाही. सुरेश धस यांनी केलेले सर्व आरोप प्राजक्ताने फेटाळून लावले आहेत. राजकारण्यांनी स्वःताच्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांच्या गलिच्छ राजकारणात महिला कलाकारांना ओढू नये, अशी विनंती प्राजक्ताने केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या गोष्टी मी ऐकत आले आहे.
शांत राहणं माझ्या अंगलट आल्याने माध्यामांसोर यावं लागल्याचे तिने सांगितले. तुमचं जे काही चाललयं ते करत राहा, पण तुमच्या गलिच्छ राजकारणात ओढू नका, अशी मागणी देखील तिने यावेळी केली. परळीला महिला पुरुष कलाकार गेला का नाही ऐवजी महिलांची नाव घेऊन त्यांच्या प्रतिमा डागाळून वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नावे घेतली जात आहेत.
स्वार्थांसाठी कलाकारांची नावे का घेता?
प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने समस्त कालाकारांच्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणे बंद करावे. त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली. हे वागणे महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. ही निंदणीय बाब आहे, असे प्राजक्ता माळी यांनी म्हटले.
कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का?
“ते जे बोलले ते इतकं कुत्सितपणे बोलले. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही फक्त महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही तर त्यांच्या कर्तृत्वावरही शिंतोडे उडवत आहात. कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टानं एखादा व्यक्ती मोठा होतो. यावर तुमचा विश्वास का नाही बसत? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता ही खेदजनक बाब आहे” असं प्राजक्ता माळी म्हणाल्या.
ट्रोलिंगचा घरच्यांवर खूप परिणाम झाला…
ती म्हणाली, माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा घरच्यांवर खूप परिणाम झाला. माझ्या भावाने सोशल मीडियात येणाऱ्या कमेंट्स वाचून त्याचं अकाऊंट बंद केल्याचे त्यांनी सांगितले. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितले.
कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या कर्तुत्वावर नाव कमावणाऱ्या महिलांना अशाप्रकारच्या लांछनांना सामोरे जावे लागते, असे प्राजक्ता माळी यांनी यावेळी म्हटले. वारंवार होणाऱ्या अशा ट्रोलिंगमुळे पीडित व्यक्ती नैराश्येत जाऊ शकते. तिच्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येऊ शकतात. त्यामुळे हे वेळीच रोखायला हवं असं त्यांनी यावेळी म्हटलं.





