Prajakta Gaikwad : नंदीवरुन बसून एन्ट्री, शंकराला पायी चालवलं… लग्नातील एन्ट्रीबाबत प्राजक्ताचं स्पष्टीकरण, “आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंडमध्ये येईल…”

Prajakta Gaikwad । Shambhuraj Khutwad | मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही शंभूराज खुटवड यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाहीविवाह सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने एन्ट्री अविस्मरणीय आणि रॉयल होती. मात्र या एण्ट्रीमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
प्राजक्ता आणि शंभूराजनं एका अवाढव्य अशा नंदीवर बसून रिसेप्शनच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री घेतली. नंदी येताच आसमंतात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि संपूर्ण वातावरण एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासारखं झालं. हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला.
परंतु ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभुराज बसलेले, त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते. ते पाहून चाहत्यांचा हिरमोड झाला आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, अनेक चाहत्यांनी भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. “हे फार चुकीचं आहे आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय, काय बोलायचं…”, “काय प्रकार आहे हा?”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, यावर आता स्वतः प्राजक्ता गायकवाड हिने स्पष्टीकरण दिल आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलतात अभिनेत्री म्हणाली की, “लग्नातील सगळे इव्हेंट्स साधे आणि सुटसुटीत ठेवले होते. संगीत, हळद आणि विशेषतः आमची एन्ट्री खूप स्पेशल होती, अनेकांना ती आवडली, पण काहींना ते फार निगेटिव्ह वाटलं.
मला प्रेक्षकांना सांगायचंय की, ज्या दिवशी लग्न असतं, त्या दिवशी ते वधू आणि वर हे फक्त स्त्री आणि पुरुष नसून लक्ष्मी-नारायणाचं स्वरूप असतात, याचा उल्लेख पुराणांतही आहे. नंदीवरून केलेली आमची एन्ट्री ही शिव-पार्वती विवाहाची संकल्पना आणि शिवगणांशी जोडलेली होती.
खूपच युनिक आणि अगदी वेगळी एन्ट्री होती. मला मोठ्ठ्यानं डीजे लावलाय आणि तिथे सगळे नाचतायत, अशी अजिबात एन्ट्री नको होती… मला स्पिरिच्युअल आणि अर्थपूर्ण करायचं होतं. शिवाय त्यांचं नाव शंभुराज असल्यामुळे ही संकल्पना नावाशीही जोडलेली होती. आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंडमध्ये येईल, असं वाटतंय.”
शाही विवाहसोहळ्याबाबत बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाली की,”खरंतर, जसं बाकीच्यांचं लग्न होतं तसंच हे नॉर्मल लग्न होतं. पण, लोकांना हे लग्नकार्य आपलंसं वाटलं. सगळ्यांनी ते आपुलकीने ते उचलून धरलं. हे लग्न इतरांसारखंच साधं होतं, सर्व पारंपरिक विधी झाले. पण लोकांनी ते आपुलकीने स्वीकारलं.
रिल्स, फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. माझ्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील लोकांशी असलेला कनेक्ट यामागचं कारण असावं. बाकी लग्नामध्ये आम्ही काहीही वेगळं केलं नव्हतं.” असं देखील प्राजक्ता यावेळी म्हणाली.





