Ranveer Singh Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या कामासंदर्भातील निर्णयांमुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने प्रभाससोबतचे दोन मोठे चित्रपट सोडले आहेत. यामध्ये ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि २’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट्स मोठ्या बजेटचे आणि खूप लांब शूटिंग शेड्यूल असलेले होते. आई झाल्यानंतर दीपिकाने आपल्या आयुष्यात काही नवीन प्राधान्यक्रम ठरवले आहेत. तिने स्पष्टपणे सांगितले आहे की आता ती दिवसाला ८ तासांपेक्षा जास्त काम करणार नाही. मोठ्या चित्रपटांमध्ये अनेकदा १०-१२ तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करावे लागते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य आणि काम यामध्ये समतोल राखण्यासाठी दीपिकाने हे प्रोजेक्ट्स नाकारल्याचे बोलले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. रणवीर सिंहचा जुना व्हिडीओ का व्हायरल? या सगळ्या चर्चेदरम्यान दीपिकाचा पती रणवीर सिंहचा सुमारे तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर ८ तासांच्या शिफ्टपेक्षा जास्त, म्हणजे १०-१२ तास काम करण्यास आपली हरकत नसल्याचे सांगताना दिसतो. २०२२ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता की निर्माते आणि ब्रँड्स त्याच्यावर विश्वास ठेवतात, कारण तो दिलेले वचन पूर्ण करतो. काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागला, तरी त्याला त्याची अडचण वाटत नाही, असेही तो म्हणाला होता. आता हे विधान दीपिकाच्या ८ तास कामाच्या निर्णयाशी जोडले जात असल्याने सोशल मीडियावर वाद रंगला आहे. ‘धुरंधर’च्या शूटिंगचा खुलासा सध्या रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी दिग्दर्शक आदित्य धर यांनी सांगितले होते की, या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने जवळपास दीड वर्ष १६-१८ तास काम केले. इतका कडक शेड्यूल असूनही कुणीही तक्रार केली नाही, असेही त्यांनी नमूद केले. एकीकडे दीपिकाचा ८ तास कामाचा निर्णय आणि दुसरीकडे रणवीरचे लांब शिफ्टबद्दलचे मत यामुळे बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.