Uddhav Thackeray : फडणवीसांकडून कौतुक, शिंदेंकडून ‘साहेब’ असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले… विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख केला. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मिश्किल टोला लगावला.

Uddhav Thackeray : विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहातून 9 सदस्यांचा कार्यकाळ संपल्याच्या निमित्ताने 24 मार्च 2026 रोजी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा देत भावना व्यक्त केल्या.
समारंभात राजकीय कोपरखळ्या, शाब्दिक फटकेबाजी आणि मिश्किल टोले पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंने ‘उद्धव ठाकरे साहेब’ असा उल्लेख आपल्या भाषणात केला. तसेच सर्व सदस्यांचे भरभरून कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांचा साहेब असा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा.” पुढे शिंदे म्हणाले, “निरोप समारंभात चांगलं बोलायचं असतं. काही जण सभागृहात पुन्हा भेटतील, तर काही जण फिल्डवर काम करताना भेटतील.
उद्धव ठाकरे शिंदेंच्या भाषणाच्या सुरुवातीला सभागृहात उपस्थित नव्हते. भाषण संपत असताना ते हजर झाले आणि म्हणाले, “मुख्यमंत्रीजी, मी जेव्हा सभागृहात आलो तेव्हा तुमच्या आधी काही जण बोलत होते ते थोडं ऐकलं… की कुठेतरी भेटू. मी तुम्हाला (फडणवीसांना) थोड्यावेळाने भेटायला येणार आहे. पण काही जणांना रणांगणात, काहींना कुठे… आणि काही जणांना असं वाटतं की आता इथे भेटलात… अशी काही लोक आहेत. असो… या सभागृहात मी सर्वांना धन्यवाद देतो.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राजकीय नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “पु. ल. देशपांडे यांना ‘कोट्याधीश’ म्हणतात. पुलंनंतर ही उपाधी द्यायची असेल तर ती मी उद्धव ठाकरे यांनाच देईन. त्यांच्या बोलण्यात मिश्किलपणा असतो, ते सहज बोलतात.” फडणवीस पुढे म्हणाले, “या सहा वर्षांत त्यांच्या कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या. जर तुम्ही पुन्हा निर्णय घेऊन सभागृहात आलात तर जास्त कोट्या ऐकायला मिळाव्यात.”
निवृत्त होणारे 9 सदस्य
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)





