वशिलेबाजीवर प्राची देसाई देखील नाराज

बॉलिवूडमध्ये वशिलेबाजीचा मुद्दा नेहमीच उपस्थित होत असतो. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा मुद्दा अधिक जोमाने मांडला जायला लागला आहे. आता ऍक्ट्रेस प्राची देसाईनेही या मुद्दयावर आपले परखड मत मांडले आहे.
बॉलिवूडमध्ये भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी अगदी रुजली आहे. वशिलेबाजी हे बॉलिवूडमधील सत्य आहे आणि ते उघडपणे मान्य केले जायला हवे. बॉलिवूडमध्ये नेहमीच काही परिवारांचे वर्चस्व राहिले आहे आणि कदाचित हे वर्चस्व कायमच राहिल.
मात्र तरिही कोण अधिक सरस आहे, आणि कोण नाही याचा निर्णय प्रेक्षक अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. अशी निवड करणे प्रेक्षकांना नेहमीच आवडत असते. कोणत्याही कलाकाराला जोपर्यंत प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असतो, तोपर्यंतच तो कलाकार बॉलिवूडमध्ये टिकाव धरून राहू शकतो, असे प्राची म्हणाली.
वशिलेबाजीमुळे दिग्दर्शक कलाकारांना गृहित धरायला लागले आहेत. स्क्रीप्ट न वाचताच सही करावी, अशी दिग्दर्शकांची अपेक्षा असते. याचमुळे तिने तिला आलेल्या काही सिनेमांच्या ऑफर नाकारल्याही होत्या.
पण प्राचीला सिनेमा करायचाच नाही, असा गैरसमजही त्यातूनच रुढ झाला आहे. प्राचीने काही सिनेमे केले आहेत. पण ती सिरीयलमध्येच अधिक सक्रिय असते.





