प्रभात किरणे : हळवी झालीच ना गं चंद्रभागा

– मिलन म्हत्रे
देहू-आळंदीतून भक्तिसागरात बुडालेला आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीला निघालेला वारकऱ्यांचा मेळा आता परतीच्या वाटेवर आहे. विठुरायाच्या भेटीने तृप्त झालेला; पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची आस घेऊन हा सोहळा देहू-आळंदीकडे वाटचाल करीत आहे. अर्थात या परतीच्या वाटेवर “मेळा’ कमी संख्येने असला तरी भक्तीची ती ओढ कुठेही कमी झालेली नसते. इंद्रायणी चंद्रभागेला भेटली आणि तो प्रवाह स्व-दिशेकडे निघाला आहे. माउलींची अवस्था या परतवारी वेळी नक्कीच अशीच असणार
थकलीस का गं माऊली
की ओढ लागली तुज अलंकापुरीची
सावलीत अंमळ विठुरायाच्या
विसावलीस ना गोपुरी…
तिकडे गोपाळांचा काला गोपाळपुरात पूर्ण होतो. आषाढीचा प्रवास अठरा दिवसांचा; पण परतवारीचा तोच आणि तितक्याच किलोमीटरचा प्रवास अवघ्या दहा दिवसांचा सुरू होतो. पंढरपूरचे वाळवंट गुरूपौर्णिमेला रिते होते. “गोपाळ काला गोड झाला… गोपाळांनी गोड केला… म्हणत संत नामदेव महाराज पंढरपूरच्या वेशीपर्यंत या संतांना निरोप द्यायला येतात, आणि रखुमाई लेकरांच्या विरह सहन करते-
होता काला गोपाळांचाव
शेव ओलावलाच रखुमाईचा
घडी निरोपाची येता
हळवी झाली ना चंद्रभागा
दोन्ही माऊलींचा विरह एकमेकांना आधार देत निघतो. वारीचे हे रूप आणि पंढरीच्या पांडुरंगाचे ते स्वरूप पाहून वारीतील प्रत्येकजण सुखावलेला असतो. आनंदे भक्तीचा हा असा अखंड सोहळा प्रत्येकजण अनुभवतो, डोळ्यांच्या कडा ओलावल्या तरी विठुरायाच्या कळसाचे दिसेपर्यंत माना मागे वळत राहतात आणि हात जोडलेले असतात. माऊली-तुकोबा आळंदी-देहूकडे वाटचाल करीत असतात. आळंदी माऊलींचे संजीवन स्थान आहे, त्यामुळेच माऊलींना आळंदीचीही ओढ आहे आणि म्हणूनच-
माऊली, इंद्रायणीच्या आठवांनी
दाटला ना तुझा कंठ
ठाव असे, अजानवृक्षी आहे
तुझे चैतन्य संजीवन…
असे सहज म्हणावेसे वाटते. वारीचा सोहळा 12 जुलैला आळंदी-देहूत स्थिरावेल. कार्तिकीला पुन्हा वैष्णवांचा मेळा भरेल आणि हे चैतन्य अखंड असेच राहील, हे नक्की!





