प्रभात इम्पॅक्ट: आंध्रा धरणातून पाणी सोडल्याने इंद्रायणीला दिलासा
Dehugaon: मृत माशांची संख्या घटली

Dehugaon : देहू येथील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आंध्रा धरणातून सोमवारी सुमारे ३०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून जलचरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाण्यामुळे देहू परिसरातील इंद्रायणी नदीच्या पात्रात अंदाजे दोन फूट पाण्याची वाढ झाली असून मागील काही दिवसांपासून दिसून येणाऱ्या मृत माशांच्या घटनांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे.
इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत होत असलेला गाजावाजा, प्रदूषणामुळे जलचरांवर आलेले संकट तसेच आषाढी वारीच्या तोंडावर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती याबाबत दैनिक प्रभातमध्ये “इंद्रायणी नदी प्रदूषण”, “इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा गाजावाजा”, “इंद्रायणीचे प्रदूषण जलचरांसाठी कर्दनकाळ” आणि “वारीच्या उंबरठ्यावर इंद्रायणीची शोकांतिका” या शीर्षकांखाली वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली होती.
Pune District : सर्वपक्षीय इच्छुकांनी पायधूळ झाडली ; राष्ट्रवादीच्या मुलाखतीत जोरदार शक्तीप्रदर्शन
या वृत्तमालिकेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या. त्याअंतर्गत आंध्रा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण सुधारण्यास मदत झाली असून त्यामुळे मासे आणि अन्य जलचरांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देहू नगरपंचायतीकडूनही विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नदीमध्ये मिसळणाऱ्या ओढे व नाल्यांवर बायो-रिमेडिएशन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सांडपाण्याचा नदीवर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रक्रियेमुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचे सहकार्यही तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिकांना आवाहन
इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, राडारोडा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा टाकाऊ पदार्थ टाकू नये. तसेच नदी आणि घाट परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.
नदीपात्र अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी जनजागृती करावी व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी केले आहे.





