Pavana Dam Water Level : पवना धरणाने गाठली तळपातळी? शहराची तहान भागवणाऱ्या धरणात फक्त ‘इतकाच’ साठा शिल्लक
Pavana Dam Water Level : पिंपरी-चिंचवडसह मावळची तहान भागविणाऱ्या मुख्य धरणांची स्थिती समोर; आंद्रा धरणात ४६ तर भामा आसखेडमध्ये ५२ टक्के पाणी उपलब्ध.

Pavana Dam Water Level – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने तसेच, पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला तसेच, इतर भागांना पावसाळ्यापर्यंत म्हणजे जूनअखेरपर्यंत पुरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणातून ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज ५२० एमएलडी पाणी उचलले जाते. पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेऊन शहरातील काही भागास पुरवले जाते.
आंद्रा धरण पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्या परिसरात पुरवले जात आहे. संपूर्ण शहराला गेल्या साडेसहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने, पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात ३९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी, काही नगरपालिका व ग्रामपंचयातीला पाणी दिले जाते.
तसेच मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात सध्या ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आंद्रा पाणी योजनेतून महापलिकेकडून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी अधिक दूषित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिकेस पाणी शुद्धीकरणावर अधिकचा खर्च करावा लागत आहे.
तर, भामा आसखेड धरणात ५२ टक्के पाणीसाठा पातळी आहे. अद्याप, भामा आसखेड पाणी योजना प्रकल्प पूर्ण न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर १६७ एमएलडी पाण्यापासून वंचित आहे. शहराजवळच्या मुळशी धरणात ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या धरणाचे पाणी मुळा नदीस सोडले जाते.




