इंद्रायणीला पर्याय ठरणारा सुवासिक भात वाण; विक्रेत्यांकडून ‘एनआर-५७ कौशल्या’ची प्रशंसा

देगाव : भोर तालुक्यातील देगाव येथे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा या नामांकित कंपनीतर्फे आयोजित भात पिकाच्या पाहणी कार्यक्रमास भोर तालुक्यातील विक्रेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक इंद्रायणी वाणाला पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेला ‘एनआर-५७ कौशल्या’ हा नवीन सुवासिक भात वाण उपस्थित विक्रेत्यांच्या विशेष पसंतीस उतरला.
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात देगाव येथील प्रगतशील शेतकरी धनंजय बबनराव यादव यांच्या शेतात लागवड केलेल्या ‘एनआर-५७ कौशल्या’ या वाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यादव यांनी सांगितले की, “या वाणात इंद्रायणीप्रमाणेच उत्कृष्ट सुगंध आहे, परंतु उत्पादन अधिक असून हा वाण करपा रोगासही कमी बळी पडतो.” त्यामुळे या वाणाने शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण केल्या आहेत.
भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘एनआर-५७ कौशल्या’ हा वाण एक नवा पर्याय म्हणून समोर येत असून, इंद्रायणीच्या तुलनेत अधिक उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक असल्यामुळे भविष्यात या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्व विक्रेत्यांनी शेतात प्रत्यक्ष पिक पाहणी करून या वाणाच्या वाढीचा, कणसाच्या आकाराचा आणि रंगाचा बारकाईने अभ्यास केला. उपस्थित विक्रेत्यांनी या वाणाबद्दल समाधान व्यक्त करत, “हा वाण इंद्रायणीला योग्य व कार्यक्षम पर्याय ठरेल,” असे मत मांडले.
कार्यक्रमाचे आयोजन निर्मल सीड्स कंपनीचे भोर-सासवड तालुका अधिकारी विनोद यादव यांनी केले होते. या कार्यक्रमास भोर तालुक्यातील अनेक नामांकित विक्रेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात महेश वालगुडे, शेखर बाठे, किरण शिवणकर, अमोल मांढरे, अर्जुन मांढरे, गौरव इंगुळकर, भाऊसाहेब गोडसे आणि संकेत कोळपे यांचा समावेश होता.
या वेळी निर्मल सीड्स कंपनीचे अधिकारी नितीन खलाटे, राहुल कारंजकर आणि मयूर नलावडे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर खलाटे यांनी विक्रेत्यांना कंपनीच्या बायो-प्रॉडक्ट्स आणि नवीन तंत्रज्ञानाधारित शेती पद्धती विषयी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व विक्रेत्यांचे स्वागत राहुल कारंजकर यांनी केले, तर विनोद यादव यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.





