Amit Thackeray – मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी डोअर टू डोअर प्रचार केला. मला जे करायचे आहे, ते मी लोकांपर्यंत पोहचवले आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. अमित पुढे बोलताना म्हणाले की, मी सदा सरवणकर यांना शुभेच्छा दिल्या. मी देवाकडे काही मागत नाही. कारण देव कायम माझ्या पाठिशी आहे. मी जसे माझे 100 टक्के प्रयत्न केले आहेत, तसेच त्यांनीही केले असतील, त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत. बोलता-बोलता सरवणकरांच्या छातीवरील धनुष्यबाणाचा बॅच उलटा झाल्याचे अमित ठाकरेंच्या लक्षात आले. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तो सरळ केला. आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माहीम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मतदारसंघात मनसेकडून अमित राज ठाकरे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सदानंद सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.