पुणे जिल्हा | जिवाची बाजी लावून वीज पुरवठा सुरळीत

सोरतापवाडी, (वार्ताहर)- सोरतापवाडी परिसरात महावितरणचे कौतुक सलग तीन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोरतापवाडी परिसराला झोडपून काढले. त्यामुळे सोरतापवाडी, तरडे, वळती, आळंदी म्हातोबाची आदी ठिकाणी वीजपुरवठा पहिल्याच दिवशी खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. घराला वीज पुरवठा करणारी लाईन व मेन लाईन यांच्यावर तरडे, आळंदी, सोरतापवाडी येथे झाडे व झाडाच्या फांद्या पडून तसेच वाऱ्यामुळे पोल पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी वीज पुरवठा बंद करून पडलेल्या पोलशिवाय उर्वरित भागात वीज पुरवठा सुरू केला.
दुसऱ्या दिवशी पडलेले पोल उभा करून वीज पुरवठा सुरळीत केला आहे. पोल उभारण्याचे काम ८० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे उरुळी कांचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण महामुलकर यांनी सांगितले. महावितरणचे कर्मचारी यांनी मेहनतीने सोरतापवाडी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता एम. राठोड यांनी तातडीने पाहणी करून काही सूचना देऊन यंत्रणा राबविली. उपकार्यकारी अभियंता प्रवीण महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सुनील टेळे, लाईनमन शरद वाघमारे, नाथा माकर, बाळू वाल्हेकर,
किरण मोहिते, रणजीत खळदकर, निलेश भोंडवे, अमोल कोळेकर, अनिकेत चौधरी, मंगेश पारथी, विजयकुमार श्रीभवानी यांनी काम केले. सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसात सकाळी सात ते रात्री तीन वाजेपर्यंत जीव धोक्यात घालून काम करुन वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.





