Pune District : पत्नीच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या

सोरतापवाडी : कौटुंबिक छळाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना 18 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जेधे चाळ इनामदारवस्ती परिसरात घडली होती; मात्र, आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचा व्हिडिओ कुटूंबीयांच्या हाती लागला अन आत्महत्येस प्रवृत्त करणार्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सूरज दामोदर पवार (वय 32, रा. इनामदारवस्ती, कोरेगावमूळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दामोदर निवृत्ती पवार (वय 60, रा. वाल्हे, वागदरवाडी, ता. पुरंदर) बुधवारी (दि. 4 जून ) दुपारी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून पवार दाम्पत्य हे कोरेगावमूळ येथील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. त्यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मयुरी ही पती सुरज यांना मारहाण करत वाद घालत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून पती सूरज यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने 18 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
तत्पूर्वी आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईल फोनमध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी मयुरी सूरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव (वय 26) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.





