पुणे जिल्हा | प्रधानमंत्री ग्रामसडकच्या रस्त्यासाठी मातीचा वापर

सोरतापवाडी, (वार्ताहर)- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यासाठी मातीचा वापर होत असून नागरिकांनी ठेकेदाराला माती टाकण्यापासून अडविले आहे. त्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. हा रस्ता चांगल्या दर्जाचा करा, अशी मागणी सोरतापवाडी व तरडे येथील नागरिकांनी केली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सोरतापवाडी ते तरडे गावाला जाण्यासाठी सोरतापवाडी येथील जुना कँनाल ते वरचे तरडे या ५.०४ किलोमीटरचा ४.६३ कोटी रुपयांचा मुख्य रस्त्याचे भूमिपूजन २०२३ रोजी करण्यात आले.
त्यानंतर काम चालू होऊन संथगतीने सुरू आहे. त्यातच ठेकेदारांने रस्त्यावर काही ठिकाणी माती टाकली आहे. हा रस्ता पंतप्रधान योजनेचा आहे की गावातील एखाद्या वस्तीवर जाण्यासाठी आहे. हा प्रश्न सोरतापवाडी व तरडे ग्रामस्थांना पडला आहे.
रस्त्यामुळे गावाची सुधारणा होईल, असे वाटले होते. पण रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर नागरिकांना याचा त्रास होत आहे. गाड्यामुळे उडालेल्या धुळीने येथील नागरिकांना प्रचंड त्रास होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्याच्या कामाचा दर्जा सुद्धा चांगला नसून ठेकेदार मालाची प्रत खराब वापरत आहेत. माती व मातीमिश्रीत मुरुम रस्त्यावर टाकत आहे. रस्त्याचे काम हळूहळू सुरू असून तरडे येथील नागरिकांना दळणवळणाची गैरसोय रोजच होत आहे.
रुग्णांना दवाखान्यात नेताना वळती व शिंदवणेमार्गे लांबून उरळी कांचनला जावे लागत आहे. त्यामुळे लवकर हा रस्ता दर्जेदार तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठेकेदराचे काम सवडीनुसार
राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हवेली तालुका उपाध्यक्ष निलकंठ काळे आणि युवा नेते संजय जगताप म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सोरतापवाडी तरडे रस्त्याचे गेले वर्षभरापासून काम चालू आहे.
ठेकेदार हा त्याच्या सवडीनुसार काम करीत आहे. त्याला वेळोवेळी सांगण्यात येत आहे तरी कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तरडे गावकरी आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
एक ते दोन दिवसांत रस्त्याला भेट देऊन माहिती घेऊ. तसेच जर चुकीचे काम केले तर तर आपण त्याची दखल घेऊ. – रावसाहेब चंद्रकांत राजे, प्रकल्प अधिकारी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना.





