Pune District : भरपावसात वीजपुरवठा सुरळीत

उरुळी कांचन परिसरात महावितरण कर्मचार्यांची जिद्द ठरली कौतुकास्पद
उरुळी कांचन – रविवारी मध्यरात्री झालेल्या परतीच्या पावसात वीजांच्या कडकडाटासह वादळी वार्यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, कदमवाकवस्ती परिसराला चांगलेच झोडपले. या वादळात 30 झाडे कोसळली, 26 पोल व 5 हून अधिक रोहित्र जमीनदोस्त झाले, तर अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याने अंधार दाटला होता.
मात्र, या संकटावर मात करत महावितरणच्या कर्मचार्यांनी अंगावर पावसाचे थेंब झेलत, जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम सुरू ठेवले. केवळ एका दिवसात संपूर्ण परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करून त्यांनी जनतेत दिलासा निर्माण केला.
विजेच्या तारांवर पडलेली झाडे हटविणे, पोल उभारणे, नवीन सामग्री आणून बसविणे, विद्युत बॉक्स बदलणे अशी अनेक कामे पावसातच करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत काम करत कर्मचार्यांनी सोमवारी (ता. 15) संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला. सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, लाईनमन पी. एस. खरमाटे, वरिष्ठ तंत्रज्ञ मुस्तफा शेख, अमोल शेलार, अक्षय पाटील, अजय डोंगरे, सिराज सय्यद, दादा चौधरी, योगेश गिरी, पांडुरंग खरात, रोहित काळभोर यांच्यासह गणेश धुमाळ, स्वप्नील गायकवाड, बालाजी मुरकुटे, पप्पू कोतवाल आदी कर्मचार्यांनी अहोरात्र झगडत वीजपुरवठा पुन्हा सुरु केला.
काही नागरिकांनी स्वतःहून महावितरणला फोन करून, घरात पाणी शिरले आहे, मीटरपर्यंत पाणी आले आहे, कृपया वीजपुरवठा सुरु करू नका, अशी विनंती केली. त्यामुळे महावितरणने प्रथम सुरक्षितता पाहूनच पुरवठा पूर्ववत केला.
वादळी पावसाचा फटका
रायवडी, रामदरा, पाटील वस्ती, सिदराम मळा, बाजार मळा येथे 7 पेक्षा अधिक पोल कोसळले.
थेऊर-कोलवडी परिसरात 2 रोहित्र व 5 पोल जमिनीवर पडले.
अष्टापुर, कोरेगाव मूळ, हिंगणगाव, भवरापूर, खामगाव टेक, शिंदेवाडी परिसरात 22 केव्हीचे तब्बल 10 पोल कोसळले.
20 ठिकाणी तारांचा संपर्क तुटला, तर 20-30 झाडे तारांवर कोसळली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पडझडीत महावितरणचे तब्बल 20 ते 30 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आमच्या कर्मचार्यांनी कार्यतत्परता दाखवली. त्यामुळे वीजपुरवठा लवकर पूर्ववत करता आला. सर्व कर्मचार्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. सुदैवाने या पावसात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, ही समाधानाची बाब आहे.
– महेश धाडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उरुळी कांचन उपविभाग





